त्र्यंबकेश्वर मधील इतर देवस्थाने

ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर

ब्रह्मगिरी पर्वत” हे असं प्रतिष्ठित स्थान आहे जिथे पवित्र गंगा नदीचा उगम झाला होता. ब्रह्मगिरी पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट असून ब्रह्मगिरी च्या पर्वतरांगांतून गंगा नदी वाहत जाते. ब्रह्मगिरी पर्वतावर ७०० पायऱ्या असून शिखराकडे जाण्यासाठी किमान ४ ते ५ तास लागतात.

“गंगाद्वार” हे ब्रह्मगिरी पर्वताचे मुख्य द्वार मानले जाते. पायथ्यापासून साधारण अर्ध्या अंतरावर गंगाद्वार स्थित आहे. येथे श्री “गोदावरी” देवीचे मंदिर सुद्धा आहे. असे मानले जाते की, गंगा नदी प्रथमतः गंगाद्वार येथे प्रकट झाली होती आणि गौतम ऋषींनी “कुशावर्त तीर्थ” इथे गंगेला पुढे जाण्यास अडवले त्यामुळे गोदावरी हि “गौतमी गंगा” नावाने ओळखली जाऊ लागली. कुशावर्त तीर्थावर १२ वर्षातून एकदा येणारा कुंभमेळा भरतो.

पवित्र गंगा नदी ३ दिशेने म्हणजेच पूर्वेकडे-गोदावरी नदी, दक्षिणेकडे-वारणा नदी तर पश्चिम दिशेला पश्चिमवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आणि अंततः ती चक्रतीर्थाला जाऊन मिळते. भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पवित्र गंगा आणि अहिल्या नदीच्या पवित्र संगमावर संतती प्राप्तीसाठी वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी येतात.