त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास
त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास
हिंदू तीर्थस्थानांपैकी स्वयंभू स्थानात “श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग” ची गणना केली जाते. हे पवित्र मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे जेथून गोदावरी नदी उगम पावली आहे. “गोदावरी नदी” हि महाराष्ट्रातील सर्वांत जास्त लांबीची (१४६५ किमी लांब) नदी आहे. अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यावरून असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इ.स.१७५५-१७८६ मध्ये श्री बाळाजी बाजाराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी ३१ वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेला. हेमाडपंती शैलीचे हे मंदिर वास्तुकलेचे अद्भुत प्रतीक आहे. मंदिराची उंची ९० फूट असून त्यास पाच कळस आहेत. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे ज्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडते.
इथे येणाऱ्या भक्तांना दर्शनाची सोय व्हावी म्हणून मंदिरात प्रवेशासाठी ६ ते ७ रांगा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगमरवरी मूर्ती स्थापित आहे. अशी मान्यता आहे कि नंदी हा शंकरांचा परम भक्त आहे म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात. मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते.