श्री संत निवृत्तिनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र
संतश्रेष्ट श्री निवृत्तिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत, म्हणून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते.
श्री निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म शके ११९५ श्रीमुखनाम संवत्सर, माद्य वद्य प्रतिपदा, सोमवार या दिवशी श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला.
त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत हे मुळचे श्रीक्षेत्र आपेगाव येथे राहणारे होते. तीर्थयात्रेच्या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरहून ते श्रीक्षेत्र आळंदी येथे आले असतांना त्यांची श्री. सिद्धोपन्तांशी भेट झाली. आलेल्या गांवातील अतिथीची विचारपूस करावी या हेतूने त्यांनी श्री. विठ्ठलपंतांची भेट घेतली व त्यांना आपल्या घरी निवास करण्याची विनंती केली.
त्याच दिवशी रात्री त्यांना आपली कन्या रुक्मिणी हिचा विवाह श्री. विठ्ठलपंतांशी करण्याबाबत ईश्वरी स्वप्न दृष्टांत झाला. परंतु विठ्ठलपंतांना हे मान्य नव्हते, परंतु त्याच रात्री श्री. विठ्ठलपंताना याच कन्येशी विवाह कारावास असा ईश्वरी दृष्टांत झाला व त्यांचा विवाह झाला.
पुढे श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार आळंदीक्षेत्रामध्ये चालूं होता. पण त्यांना संतती मात्र होत नव्हती. श्री विठ्ठलपंत हे वैराग्यवान् असल्यामुळे त्यांचे मन संसारांत रमत नव्हते, म्हणून ते सतत पत्नीकडे संन्यास घेण्याविषयी परवानगी मागत असत. शेवटी एक दिवस उद्वेगाने त्यांना जा म्हणून सांगितले असता श्री. विठ्ठलपंतांनी काशीक्षेत्री जाऊन सन्यास आश्रमाचा स्विकार केला व ते नृसिंहाश्रम स्वामींकडे त्यांच्या मठामध्यें राहूं लागले.
इकडे माता रुक्मिणी अतिशय दु:खी अवस्थेमध्ये व्रतस्थ जीवन जगूं लागली. रोज इंद्रायणीचे स्नान, सिद्धेश्वराचे दर्शन व सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा असा तिचा नित्यनेमच झाला होता.
येथे काशीक्षेत्री श्री. विठ्ठलपंत चैतन्याश्रम या नवीन नांवाने मठामध्ये रहात होते. तेंव्हा एक दिवस स्वामी नृसिंहाश्रम स्वामींना भगवान् विश्वेश्वराचा दृष्टांत झाला कीं, या चैतन्याची भार्या त्याची घरी वाट पहात आहे. त्यावेळी स्वामींनी स्वत: आळंदी येथे माता रुक्मिणीची भेट घेतली व तिला काशीक्षेत्री नेऊन पुन्हा दोघांची भेट घडवून आणली. व त्या दोघांना संसारात प्रवेश करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे श्री. विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांचा संसार पुन्हा सुरु झाला. पण त्यावेळी आळंदी मधील समाजधुरीणांना धर्मामार्तंडांना हे मान्य झाले नाही व त्यांनी श्री विठ्ठलपंतांना वाळीत टाकले व श्री विठ्ठलपंत सिद्ध बेटामध्ये राहूं लागले.
यानंतर त्यांना श्री निवृत्तिनाथ, श्री ज्ञानदेव, श्री सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली. यामध्ये श्री निवृत्तिनाथ हे शंकराचे, श्री ज्ञानदेव हे विष्णूचे व श्री सोपान देव हे ब्रह्मदेवाचे अवतार असून श्री मुक्ताबाई ह्या आदिशक्ति आहेत.
अशा प्रकारे सिद्ध बेटामध्ये रहात असतांनाच श्री विठ्ठलपंताना त्र्यंबकेश्वर येथे जाऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याची इच्छा झाली व ते सर्वांना घेऊन त्र्यंबकेश्वरी आले. त्यावेळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे परिसरामध्ये सर्वत्र घनदाट जंगल होते. त्यावेळी ही प्रदक्षिणा करणे अतिशय अवघड होते. तेव्हा जंगलामधून जात असतांना एक वाघ त्यांच्या मागून आला. त्यावेळी त्यांची पळापळ झाली व त्यांच्यात ताटातूट झाली. तेंव्हा तो वाघ श्री निवृत्तिनाथांच्या मागे लागला . श्री निवृत्तिनाथ पळत पळत एका गुहेमध्ये शिरले असता, तो वाघ निघून गेला. ती श्री गहिनीनाथांची गुहा होती. श्री गहिनीनाथ हे नाथ संप्रदायाचे श्री विष्णूचे अवतार होते.ते श्री निवृत्तिनाथांवर अनुग्रह करण्यासाठीच तेथे त्यांची वाट पहात होते. तेथे त्यांनी . श्री निवृत्तिनाथांना नाथ संप्रदायाची दिक्षा दिली. व पुढील कार्यासाठी त्यांना आज्ञा दिली. येथे श्री विट्ठलपंत आणि परिवार श्री निवृत्तिनाथांची वाट बघत याच क्षेत्रामध्ये थांबले होते. श्री निवृत्तिनाथांनी परत आल्यावर घडलेला सर्व प्रसंग आपल्या मातापित्यास सांगितला . हे सर्व ऐकल्यावर श्री ज्ञानेश्वर महाराजांनीं श्री निवृत्तिनाथ महाराजांचे शिष्यत्व पत्करले आणि येथूनच त्यांच्या कार्यास सुरूवात झाली.
पुढें श्री विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांचे मौंजी-बंधन व्हावे यासाठी धर्मपीठाकडे परवानगी मागितली असता, आळंदी येथील धर्मसभेने त्यांना उभयतांना देहान्त प्रायश्चित घेण्यास सांगितले व या भावंडाना पैठण येथून शुद्धिपत्र आणण्यास सांगितले.
त्यासाठी हे चारहि भावंडे पैठण क्षेत्रामध्ये आले. येथे धर्मसभेपुढे आल्यावर येथील ब्राह्मणांना त्यांचे महत्व समजले नाही. म्हणून त्यांनी ह्या भावंडांची अवहेलना केली. तेव्हां तेथील विद्वानांचा अहंकार मोडून काढण्यासाठी श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेडयामुखी वेद वदविले. व सर्व जगाला स्वतःची ओळख करून दिली.
यानंतर नेवासा क्षेत्री जाऊन श्री निवृत्तिनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांना गीतेचा अर्थ मराठीत सांगण्याची आज्ञा केली. व या ठिकाणी श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ह्या दोन ग्रंथांची रचना केली.
यांनंतर ही चारहि भावंडे पुनः आळंदी क्षेत्रामध्ये आली. येतांना रस्त्यामध्ये पैठण क्षेत्रापासून त्यांच्या बरोबर आलेला रेडा श्रीक्षेत्र आळे येथे मरण पावला. त्याची समाधि श्रीक्षेत्र आळे येथे आहे.
आळंदीमध्ये आल्यानंतर आता त्यांना कोणत्याहि शुद्धिपत्राची गरज नव्हती; पण श्री विसोबांचा अहंकार काही जात नव्हता. त्यावेळी मांडे भोजनाची इच्छा श्री निवृत्तिनाथांनी व्यक्त केली व पाठीवर मांडे भाजण्याच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा खेचरांना अनुग्रह दिला. त्याचप्रमाणे चांगदेव महाराजांनाहि जड भिंत चालवून चांगदेव पासष्टीच्याद्वारां अनुग्रह दिला.
आता या चारहि भावंडानी आपल्या अभंग रचनेच्याद्वारां पंढपुरचीवारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले. यामध्ये श्री निवृत्तिनाथांनी सुमारे ३५७ अभंगाची रचना केली आहे.
अशाप्रकारे वारकरी संप्रदायाची बैसका श्री निवृत्तिनाथमहाराजांनी बसवली व श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला.
शेवटी श्री निवृत्तिनाथांनी आपल्या हातांनी भगवान् पांडुरंगाच्या उपस्थितींत श्री ज्ञानेश्वर महाराजांना कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी आळंदी येथे संजीवन समाधि दिली. त्यानंतर मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी सोपान महाराजांना श्रीक्षेत्र सासवड येथे संजीवन समाधि दिली. त्यानंतर वैशाख वद्य दशमीचे दिवशी तापी तिरावर भुसावळ जवळ एदलाबाद (मुक्ताईनगर) येथे श्री मुक्ताबाई आकाशांत गुप्त झाल्या.
सरते शेवटी जेष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ रोजी भगवान् पांडुरंगाने स्वतः श्री निवृत्तिनाथ महाराजांना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधि दिली.
धन्य धन्य निवृत्ति देवा । काय महिमा वर्णावा ।। 1 ।।
शिवे अवतार धरून । केले त्रैलोक्य पावन ।। २ ।।
समाधि त्र्यंबकशिखरी । मागे शोभे ब्रह्मगिरी ।। ३ ।।
निवृत्तिनाथांचेि चरणी । शरण एका जनार्दनी ।। ४ ।।
- (श्री एकनाथमहाराज अभंग गाथा)