दैनंदिन कार्यक्रम

-

श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या मंदिराची दारे सकाळी ५.०० वाजता उघडली जातात. व काकडा भजनास सुरुवात होते. त्यानंतर ५.३० वाजता महाराजांना काकड आरतीने उठविले जाते. व नंतर ७.३० पर्यंत महाराजांच्या समाधिची पंचामृत अभिषेक पूजा केली जाते. सकाळी ७.३० पासून भाविकांना समाधि जवळ जाऊन महाराजांचे दर्शन घेता येते. यानंतर दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत महाराजांना महानैवेद्य दाखविला जातो. महानैवेद्यापर्यंत भाविकांना समाधिवर अभिषेक पूजा पुजाऱ्यां मार्फत करता येतात. दुपारी ४.०० वाजता श्रींचा पोशाख केला जातो. रात्री ८.३० वाजता पंचपदी भजन, हरिपाठ झाल्यावर रात्री ०९.३० वाजता महाराजांची शेजारती झाल्यावर मंदिराची दारें दर्शनासाठी बंद केली जातात. हे सर्व दैनंदिन कार्यक्रम व उत्सवातील धार्मिक कार्यक्रम संस्थान मार्फत पुजारी कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली पार पाडली जातात. तसेच वर्षभरात काही अखंड हरीनाम सप्ताह भाविकांमार्फत केले जातात. त्यामध्येहि संस्थानचा सक्रीय सहभाग असतो. तसेच दर वद्य एकादशीला महाराजांची वारी भरते. वारीला साधारण २५ ते ३० हजार भाविक येत असतात. त्यामध्ये वद्य दशमीला किर्तन, एकादशीला प्रवचन, मालिका भजन, दिंडी, कीर्तन व दोन दिवस जागर होतो. द्वादशीला काल्याचे कीर्तनाने वारीची सांगता होते. या वारीमध्ये दशमीला संध्याकाळी ठरलेल्या गावांमार्फत भाविकांना अन्नदान होते. एकादशीला फराळ वाटप होतो व द्वादशीला काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद / भोजन दिले जाते व वारीची सांगता होते. दर शुद्ध एकादशीला भजन व जागर होतो.